अचलपूर बांधकाम उप-विभागात प्रभारी अभियंत्याचा तीन वर्षांपासून बदल नाही – राजकीय हस्तक्षेपाची चर्चा, जनतेत नाराजी

0
4
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती (प्रतिनिधी) : अचलपूर जिल्हा परिषद बांधकाम उप-विभागातील शाखा अभियंता नितीन झगडे हे मागील दोन ते तीन वर्षांपासून प्रभारी उप-अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या जीआरनुसार कोणताही प्रभारी अधिकारी दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी नियुक्त ठेवू नये, असा स्पष्ट नियम असतानाही त्यांच्याकडेच हा चार्ज कायम ठेवण्यात आल्याने प्रशासन व राजकीय वर्तुळासह जनतेतही नाराजी पसरली आहे.

अचलपूर कार्यालयातच पात्र व अनुभवी कर्मचारी असूनही त्यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी न सोपवता ठरावीक अधिकाऱ्यालाच अभय दिले जात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. यामागे राजकीय हस्तक्षेप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याची कुजबुज आहे.

दर्यापूर, मोर्शी आणि अमरावती येथे नियमित डेप्युटी अधिकारी उपलब्ध असतानाही त्यांच्यापैकी कुणालाही अचलपूरचा चार्ज न देता, झगडे यांच्याकडेच तो कायम ठेवला जाणे हे एकतर्फी व पक्षपाती धोरणाचे उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

या घडामोडींमुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी असून, काहींनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, आता सामान्य अचलपूरकर नागरिकही “एका व्यक्तीकडेच वर्षानुवर्षे चार्ज देण्यामागे काय राजकारण आहे?” असा सवाल उपस्थित करत आहेत. पारदर्शक व नियमानुसार प्रशासन व्हावे, अशी जनतेची अपेक्षा असून, यावर लवकर ठोस निर्णय न झाल्यास लोकांचा प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

veer nayak

Google Ad