अमरावती, दि. 19 : चिखलदरा तालुक्यातील वृद्धेला जादूटोणाच्या संशयातून झालेल्या मारहाणीप्रकरणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना गावांमध्ये सौदाह्र्यपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आज दुपारी रेयट्याखेडा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, प्रवीण झगडे, तहसीलदार जीवन मोरानकर, पोलिस उपअधिक्षक सिद्धेश्वर धुमाळ, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांच्यासह भेट दिली आणि घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती पिडीत महिलेकडून जाणून घेतली.
रेयट्याखेडा येथील वृद्ध महिलेला ३० डिसेंबर रोजी गावातील पोलीस पाटील यांच्यासह काही नागरिकांनी जादूटोण्याच्या संशयातून अमानूष मारहाण केली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी गंभीर दखल घेत आज गावात जाऊन वृद्ध महिलेच्या घरी भेट दिली. सदर प्रकरणी महिलेकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. यात पोलिस पाटलासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे.
भेटी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. गावात सौदाह्र्यपूर्ण वातावरण ठेवावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांसोबत मारहाणीसारखे अमानूष प्रकार होत असल्यास याचा विरोध करावा, असे आवाहन केले.
भविष्यात गावामध्ये अशाप्रकारचे प्रसंग घडू नये, यासाठी प्रशासनातर्फे मंगळवार, दि. २१ जानेवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांना अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.