धामणगाव ( रे ) ता.19.
पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.
याच पार्श्वभूमीवर धामणगाव (रेल्वे) तालुक्यातील संविधान प्रेमी आंबेडकर जनतेने आज तारीख 19..12.24 ला भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
संविधानाची विटंबना प्रकरणी निघालेल्या मोर्चात संविधान रक्षणासाठी आंदोलनात सहभागी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला.
तसेच वच्छलाबाई मानवते यांना बेदम मारहाण केल्याचे पडसाद महाराष्ट्रसह संसदेतही उमटत आहे.
सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूचे सत्य सामोर यावे तसेच जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व संविधानाची विटंबना करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासारख्या विविध मागण्यांसाठी धामणगाव तालुक्यातील संविधान प्रेमी व आंबेडकर जनता मोठ्या संख्येने निषेध मोर्चात सहभागी झाली होती.
निषेध मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार यांचे मार्फत शासनाकडे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशीचा व्यवस्थेने बळी घेतला असून कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी जनतेला लक्ष करून बेदम मारहाण करण्यात आल्याने लोकशाही व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
परभणी आंदोलनातील पिडीतांना न्याय मिळावा यासाठी नगरपरिषद प्रांगणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मल्यार्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन निघालेल्या या निषेध मोर्चाचा समारोप भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून करण्यात आला.
पडितांच्या न्याय हक्कासाठी निघालेल्या या निषेध मोर्चामध्ये धामणगाव तालुक्यातील संविधान प्रेमी व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती.