चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी
चांदुर रेल्वे – चांदुर रेल्वे येथील शिवाजीनगर येथे राहणारे बाबाराव सुदाम साखरवाडे यांचे आज रोजी वय १०३ वर्ष असून ते आताही स्वतः कष्ट करून आपला आणि आपल्या पत्नीचा उदरनिर्वाह करत आहे. त्यांची पत्नी घर काम करतात मात्र बाबाराव साखरवाडे स्वतः कष्ट करून आपल्या पत्नीला नेहमी सुखी ठेवण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहे. त्यांच्या पत्नीच्या डोळ्याने दिसत नसल्यामुळे स्वतः स्वयंपाक करून पत्नीला जेवण करून देतात. या दोघांच्या इतक्या वयात सुद्धा एकमेकाबद्दल असलेलं प्रेम मनाला भारावून टाकत. ह्या प्रेमळ जोडप्याला १ मुलगी व ३ मुले आहेत परंतु कोणावरही अवलंबून न राहता बाबाराव साखरवाडे स्वतः काबाडकष्ट करतात कधी जंगलात जाऊन खोडांच्या झिलप्या फोडतात तर कधी मंदिरात नारळ विकतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून दोघेही समाधानाने जगतात. म्हातारीच्या डोळ्याने दिसत नसल्याने बाबाराव आपल्या पत्नीची खूप काळजी घेतात. १०३ वर्षाचे वय होऊन बाबाराव यांना डोळ्याने दूरचे सुद्धा स्पष्ट दिसते. आणि कोणतीही बिमारी नसल्याचे अभिमानाने ते सांगतात. त्यांच्या डोळ्याला कोणताही चष्मा आढळून आलेला नाही. त्यांच्या शरीर वृष्टी कडे पाहून त्यांचा वयाचा अंदाज लावणे कठीण आहे.
आजच्या युगात या धावपळीच्या जीवनात १०३ वर्षाचे आयुष्य म्हणजे खूप झाले. पण या वयात बाबाराव साखरवाडे त्यांच्या सायकल वरती वीस ते पंचवीस किलो वजन घेऊन सायकल लोटत मंदिरापर्यंत नारळ, कधी झीलप्या नेवून विकतात. या वयात सुद्धा स्वतःच्या भरोशावर जगतो. असे ते गर्वाने सांगतात. असा हा स्वाभिमानी माणूस बाबाराव सुदामजी साखरवाडे आपल्या छोट्याशा चांदुर रेल्वे शहरात स्वाभिमानाने जगत आहे. यांच्या स्वाभिमानाची दखल आज तालुका प्रतिनिधी प्रकाश रंगारी यांनी घेतली आहे.