“राष्ट्रसंत तुकडोजींचे धर्मतत्त्वज्ञान”

0
49
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ समाजातील सर्वच स्तरांसाठी जीवन संजीवनी किंवा आदर्श आचारसंहिता ठरावा असा ग्रंथराज आहे! सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याची दिशा देण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. १९५३ मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लेखनास प्रारंभ करून मे १९५४ मध्ये हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला; मात्र दुर्दैवाने तो चोरीस गेला आणि योगायोगाने पुन्हा सापडून १९५५ ला प्रकाशित झाला! ग्रामनाथाला अर्पण केलेल्या या ग्रंथात ऐकून ४१ अध्याय मिळून आठ पंचक असून त्यात ४६७५ ओव्या आहेत. साधारणपणे पाच अध्यायांचे एक पंचक!

 प्रस्तुत लेखात ‘सद्धर्म मंथन पंचक’ या पहिल्या पंचकातील ‘देवदर्शन’, ‘धर्माध्ययन’, ‘आश्रमधर्म’, ‘संसार परमार्थ’, ‘वर्णव्यवस्था’ या पाच अध्यायांच्या आधारे राष्ट्रसंतांच्या सामाजिक दूरदृष्टीपूर्ण विचारांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचकाचे शीर्षक ‘सद्धर्म मंथन’ हेच फार सूचक आहे. समकालीन परिस्थिती लक्षात घेता या पाचही आध्यायांमधील ओव्या जीवनाला अतिशय उपयुक्त ठरेल इतक्या प्रेरक आहेत. परिवर्तन हा जरी काळाचा नियम असला तरी होणारे परिवर्तन हे कालोचित असावे! म्हणजे समाजाला त्या परिवर्तनाचे मार्गदर्शन मिळते. मात्र परिवर्तन जर इतरांच्या विशिष्ट जीवनशैलीने प्रभावित आणि सांस्कृतिक वारसा धुळीस मिळवणारे असतील तर त्यावर नियंत्रण म्हणून सामाजिक उत्थान गरजेचे ठरते! समाजातील प्रत्येक माणूस हा धर्मानुयायी असतो. त्याचे तसे आचरण असते मात्र धर्माचा वास्तविक अर्थ जर त्याला कळला नाही तर तो मूळ धर्माचरणापासून भरकटू शकतो किंवा त्याच्या मनात अपुऱ्या ज्ञानामुळे इतरांच्या धर्माबद्दल द्वेष निर्माण होऊ शकतो म्हणून या अध्यायांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी धर्माचरण कसे असावे याचे सखोल विचार मंथन केले आहे. 

“प्रथम पाया मानव वर्तन । यास करावे उत्तम जतन । गाव करावे सर्वांगपूर्ण । आदर्श चित्रं विश्वाचे”।। (अ.०१, ओ.४८)

माणूस हा समाजाला जबाबदार असतो त्यामुळे त्याला गावाच्या विकासासंदर्भात काही मूळ धर्मतत्त्वांचे पालन करावे लागते त्यामुळे समाजाचे स्वरूप शुद्ध राहण्यास मदत होते. वर्तन हाच जीवनाचा पाया आहे आणि तो भक्कम असणे अत्यंत गरजेचे आहे. गाव हे विश्वाचे छोटे रूप असल्यामुळे गावाचा सर्वांगसुंदर वर्तनव्यवहार देशाशी निगडित असतो. गावाची वर्तनस्थिती जर बदलली तर देशाला अवकळा यायला वेळ लागणार नाही. म्हणून समाजातील प्रत्येक माणसात आदर्श विचारकार्याची पखरण होणे आवश्यक आहे. समाजसुधारण्याच्या दृष्टीने संतांनी जे तत्वज्ञान सांगितले आहे ते अलिकडच्या काळात काही समाजद्रोह्यांनी विपर्यस्त करून माणसा-माणसात, जाति-जातीत, धर्मा-धर्मात भेद निर्माण केला आहे. गावाची शांतता भंग करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अशा समाज विघातक कृत्यांना समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येक घटकाने प्रयत्न केले पाहिजे! राष्ट्रसंतांच्या मते आपली संपत्ती, संतती आणि कार्यशक्ती आपली नसून तिचा व्यक्तिशः उपभोग न घेता त्याचा उदारतेने समाजासाठी उपगोग करावा हीच खरी समाजसेवा असून त्यातच देवत्त्व आणि धर्मकार्य सामावले आहे! 

“धर्म बोलावया शब्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक । लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया” ।। (अ.०२,ओ.०२)

अलीकडील काळात धर्म हा सत्तेचे केंद्र बनला असून त्याचा फायदा घेऊन काही लोक स्वार्थाने वागतात. धर्मसहिष्णूता बाजूला सारून धर्मांधतेचे विष कालवले जात आहे. अर्थात धर्म ही संकल्पनाच विपर्यासाने मांडली जात आहे. त्या मागील शुद्ध सात्विकता, सर्वसमावेशकता, विविधतेतील एकता हेतुपुरस्सर बाजूला ठेवून त्यावर कट्टरतेचे अवगुंठण चढवले जात आहे. कट्टरतेची झिंग एवढी पक्की होत आहे की एक धर्म दुसऱ्या धर्माचा शत्रू झाला आहे. धर्माचरनामागील शुद्ध सात्त्विकता मागे पडली. ती सात्त्विकता पुन्हा नव्याने जागृत करून चरित्र्यपूर्ण सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी काया-वाच्या-मने झटणे आवश्यक होऊन बसले आहे! जेणेकरून समाजात, धर्मांत एकसंधता कायम राहील. 

         प्रत्येक माणसाला पंचमहाभुतांपासून निर्मित शरीर, मन, वाणी, इंद्रिये, बुद्धी, प्राण या अमृततुल्य बाबी प्राप्त झाल्या आहेत यांचा उपयोग सामाजिक आणि धार्मिक विकासा संदर्भात केला जावा एवढीच माफक अपेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केली आहे. प्रत्येक धर्माचे आपले स्वतःचे संस्कार आणि संस्कृती आहे. तशीच हिंदूधर्माची सुद्धा संस्कृती आणि संस्कार आहेत. त्यात चार आचार-आश्रम सांगितले असून त्यानुसार आपले आयुष्य कल्पून उन्नतीसाठी सतत प्रयत्न केला पाहिजे. या सर्व बाबी लहानपणापासून संस्कारांच्या माध्यमातून लहान, थोरांनाही पटवून देण्यासाठी शिक्षितांनी प्रयत्नरत असावे, यांसाठी गुरुजनांचे साहाय्य, कार्य महत्त्वपूर्ण ठरू शकते! या संदर्भात राष्ट्रसंत म्हणतात-

“गुरुजनी ऐसे द्यावे धडे । आपुला आदर्श ठेऊनी पुढे । विद्यार्थी तयार होता चहूकडे । राष्ट्र होईल तेजस्वी” ।। (अ.०२,ओ.८७)

समाज, गाव, देश यांतील व्यवहार सुरळीत चालू राहावे यासाठी न्याय, नीती, परस्पर संबंध या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी मुलांना कुटुंबातूनच मूल्यशिक्षण देण्यात यावे म्हणजे सलोख्याचे वातावरण तयार होण्यास मदत होईल. जात, धर्म, पंथ जरी भिन्न असले तरी माणूस हा एक आहे आणि त्याला जोडणारे सूत्र मानवता हेच असले पाहिजे! माणसाच्या कर्मानुसार, गुणांनुसार समाजात त्याला योग्य-अयोग्य स्थान दिले गेले पाहिजे. म्हणजे दंड, भय या गोष्टींना फार महत्त्व राहणार नाही आणि सर्व समाज सुखी जीवन जगू शकेल!

           आश्रमधर्मानुसार चार आश्रम सांगितले आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम! जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाने या चार धर्माश्रमाचे पालन करायचे असते, ती जबाबदार नैतिक जीवनाची चाकोरी आहे. जीवन मर्यादा लक्षात घेता ही आश्रम व्यवस्था प्रत्येक माणसाला सुयोग्य व आनंददायी जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारे मोह, माया, मद, मत्सर यासारखे अवगुण येत असतात त्यांना आपल्या जीवनांत स्थान न देता माणुसकीला स्थान देऊन उपरोक्त धर्माश्रमाचे पालन केल्यास जीवनात आनंद प्राप्त होतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या संदर्भात प्रस्तुत पंचकात विस्तृत विवेचन केले आहे. मुलगा वयात आल्यापासून जसे मनास येईल तसे वागायला लागतो किशोर वयातच तारुण्य उपभोगायचा प्रयत्न करतो म्हणून अशा व्यक्तीच्या जीवनात दुःखा शिवाय काही उरत नाही. कारण ब्रह्मचर्य टिकवणे अत्यंत कठीण कार्य आहे-

“मुक्याने वेद अभ्यासावे । लंगड्याने पर्वती चढावे । आंधळ्याने युद्ध करावे । तैसे कठीण ब्रह्मचर्य” ।। (अ.०३, ओ.१७)

म्हणून चारही आश्रमांमध्ये ब्रह्मचर्याला अधिक महत्वाचे स्थान आहे. गृहस्थाश्रमात स्वतःबरोबरच कौटुंबिक जबाबदारी अत्यंत प्रामाणिक पणे पार पाडणे गरजेचे आहे. आपल्या वर्तनाने माता-पित्यापासून तर बहिन-भावंडांपर्यंत सर्वांना सुख समाधान मिळायला पाहिजे. पत्नी व मुलाबाळाची काळजी घेऊन त्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वीकारावी. गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रमाचे महत्त्व ओळखून सांसारिक जीवनातून पूर्णपणे निवृत्त व्हावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात-

“असा हा संसाराचा तमाशा । वारे संसाराची आशा । सगळ्या आयुष्याची दुर्दशा । वासनेपायी” ।। (अ.०३, ओ.६२)

म्हणून माणसाने वासनेतून वेळीच निवृत्त होऊन त्यागी जीवनास सुरुवात करावी आणि आपले जीवन फक्त आपल्या घरापर्यंतच मर्यादित नसून संपूर्ण विश्वच आपले घर आहे ही वैश्विक भावना त्याच्या मनात निर्माण व्हावी! हेच शिकण्यासाठी सांसारिक जीवन असून मानव जन्माचा उद्धार याच मार्गात सामावलेला आहे! कोणताही आश्रम असो माणसाकडे संयम आणि त्याग या दोन गोष्टी असणे नितांत गरजेचे आहे त्यानेच विकासात वृद्धी होऊन माणूसपण प्राप्त होण्यास मदत होते. अर्थात संन्यासाश्रम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. सत्य अंगिकारून धर्मपालनाचे ध्येय साध्य करण्यासाठी कर्मसिद्धांत म्हणून ही व्यवस्था समजून घेणे गरजेचे आहे! हाच सर्व धर्मग्रंथांचा सार आहे.

“सुखे करावा संसार । साधेल तैसा परोपकार । चारही आश्रमांचा सार । आचारणी आणावा” ।। (अ.०४,ओ.३६)

सांसारिक जीवणासोबत परोपकार आचरणात आणावा आणि आपले घर जसे आपल्यास प्रिय तसे संपूर्ण गावं आपला म्हणून आपण अखंडपणे कर्तृत्त्व करत राहावे हीच खरी देशसेवा आणि ईश्वर सेवा आहे. वैराग्याला (संन्यासी) वैराग्य सांभाळता आले पाहिजे त्याला पुन्हा गृहस्थिच्या मोहपाशात अडकणे योग्य नव्हे! लोभाचा त्याग करून जीवन सार्थकी लावणे महत्वाचे, नाहीतर समाजात हसे होण्यास वेळ लागणार नाही. ग्रामधर्माचे महत्त्व ओळखून जीवनाला स्वतःच्या कर्तृत्वाने महातीर्थ करावे ही अपेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज करतात.

           सामाजिक जीवनातील मानवी व्यवहार सुयोग्य व सुरळीत चालावे यासाठी वर्णव्यवस्थेचे उपयोजन केले आहे असे म्हटले जाते परंतु राष्ट्रसंतांच्या मते मुळात सर्वच लोक समान आहेत त्यांच्यात जातीपातीवरून भेद न करता समन्वय घडवून आणला पाहिजे, आणि मानवांच्या गुणकर्मानुसार त्यांना समाजात स्थान असले पाहिजे.

“जो ज्यापासी उत्तम गुण । त्यानेच त्याचे चालावे जीवन । व्हावे समाजाचेही धारण पोषण । हीच योजना चतुवर्णी” ।। (अ.०५, ओ.२०)

“म्हणौनि गुणांवरचि लक्ष द्यावे । जो ज्यागुणी तो त्या वर्णी म्हणावे । सर्व गुणांचा आदर स्वभावे । सर्वांकरिता असावा” ।। (अ.०५, ओ.७९)

गुणकर्मावर आधारित समाजव्यवस्था असणे आवश्यक आहे. जेणेकरून कर्तृत्ववान लोकांना त्यांच्या योग्यतेनुसार स्थान मिळून समाजाची सेवा करण्याची योग्य संधी आणि सन्मान मिळेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील हे प्रेरणादायी विचारधन माणसाला सद्धर्म मंथन करायला लावून यथायोग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करते!

•••••

प्रा. डॉ. अतुल साहेबराव वानखडे

मो. ९६०४०७२०७५

veer nayak

Google Ad