निवडणुकीतील प्रत्येक टप्प्याची काळजीपूर्वक कार्यवाही करावी – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

0
7
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 16: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याने सर्व मतदारसंघांत एकाचवेळी कार्यवाही करावी लागणार आहे. प्रामुख्याने उमेदवारी अर्ज, मतदान आणि मतमोजणी या निवडणुकीच्या टप्प्यावर सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, गेल्या निवडणुकीमधील त्रृटी यावेळी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या त्रृटी दूर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधिक लक्ष द्यावे. प्रामुख्याने एकूण मतदानाच्या आकडेवारीमध्ये विसंगती दिसून येते. त्यामुळे मतदान पथकाला सदर मतदानाची एकूण संख्या कळविताना अचूक कळविण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच डाटा तयार करताना अचूक आकडेवारी देण्यासाठी जबाबदार पथक नेमण्यात यावे. ही आकडेवारी परत तपासून पहावी.

यावेळी निवडणूक आदेशासोबत टपाली मतपत्रिका राहणार आहे. त्यामुळे आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. दिव्यांग आणि 85 वर्षे वयाच्या नागरिकांना घरून मतदानाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना टपाली मतपत्रिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

नागरिकांकडून मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे सध्यास्थितीत नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात यावी. तसेच नाव नोंदणीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे. अर्जाबाबत शंका असल्यास बीएलओमार्फत स्थळ पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात यावा. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मतदान चिठ्ठी पोहोचविणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठी देण्यात यावी. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचा सहभाग घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

veer nayak

Google Ad