विजयादशमी आणि दसरा.
दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करावी लागतात.
चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते.
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वेचे कला शिक्षक- चित्रकार अजय जिरापूरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर “विजयादशमी” निमित्त फलक रेखाटन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत..