अमरावती, दि. 28 : देशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व रस्ते बांधणीचे कामे वेगाने सुरु असून वाहतुकीचा वेग वाढला आहे. वाढत्या वेगासोबतच रस्ते अपघातामध्येही लक्षणीय वाढ चिंताजनक आहे. अपघात होण्याचे मुख्य कारण परिपूर्ण प्रशिक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहनचालकांना योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अशा प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून उत्तम प्रशिक्षित वाहनचालक निर्माण होऊन अपघात कमी होण्यास निश्चित मदत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
मार्डी रोडवरील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केंद्रीयमंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, विभागीय परिवहन अधिकारी उर्मिला पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता आदी उपस्थित होते.
देशात राष्ट्रीय महामार्ग जलद गतीने तयार होत असून यामुळे पैसा, पर्यावरण व वेळेत बचत होत आहे. वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे रस्ते अपघातामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात येत आहे. यातून प्रशिक्षित वाहनचालक निर्माण करण्याचे धोरण आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे राज्यातील पहिले केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे प्रशिक्षित वाहनचालक तयार होतील, असा विश्वास केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.
रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करीत आहे. त्यामध्ये अपघात प्रवण स्थळाचा शोध घेऊन दुरुस्ती करणे, वाहननिर्मिती करणाऱ्या उद्योगांना वाहनामध्ये एअर बॅग, ऑटोमॅटिक ब्रेकींग सिस्टीम, आधुनिक तंत्राचा वापर करुन अपघात नियंत्रण सुविधा निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन, सीएनजी, इॅथेनॉल इंधनावर चालणाऱ्या वाहनाचा एक सशक्त व परवडणाऱ्या पर्यायाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल होत आहे. प्रशिक्षित वाहनचालकांना देश-विदेशात 22 लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून देशाच्या विकासाला चालना मिळणार आहे. कौशल्य विकास क्षेत्रात मोठी मागणी असून प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या संधीचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी केले.
प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्रामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. या केंद्रामध्ये चांगले प्रशिक्षित वाहनचालक तयार होवून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात रस्ताचा विकास झपाट्याने होत असून पर्यावरणपूरक इंधनाला ते प्रोत्साहन देत आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमामुळे देशाच्या विकासात हातभार लागत असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातील केंद्रीयमंत्री श्री. गडकरी यांनी प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. सिपना शिक्षण प्रसारक मंडळ व प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष जगदिश गुप्ता यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. इशांत राजगुरु यांनी केले. तर राखी गुप्ता यांनी आभार मानले.