जिल्ह्यात ३ लक्ष ९५ हजार पात्र महिलांचे अर्ज मंजूर
महिलांच्या चेहऱ्यावर हास्य आणि समाधान
अमरावती,दि. १७ महिलांना आत्मनिर्भय व स्वावलंबी बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्य शासनाने सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील १ कोटी ४७ लाख बहिणींना मुख्यमंत्री महोदयांच्या रुपाने त्यांचा ‘भाऊराया’ भेटला आहे. शासनाची प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. ज्या पात्र बहिणींचा अर्ज अद्याप अर्ज भरायचा राहिलेला आहे, त्या बहिणींना अन्य महिलांनी सहकार्य करण्याचे आवाहन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आज येथे केले .
नियोजन भवन येथे आज ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या राज्यस्तरीय शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे या योजनेचा वचनपूर्ती सोहळा थाटात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, आमदार प्रतापदादा अडसड, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा योजनेचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
खासदार डॉ. बोंडे म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासन राबवित आहे. अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ४ लक्ष लाभार्थ्यांपैकी ३ लक्ष ९५ हजार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत . उर्वरित ५ हजार अर्जावर येत्या दोन दिवसात कार्यवाही होईल. नवीन अर्जाची नोंदणी सुरू आहे. बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. उर्वरित पात्र महिलांच्या खात्यात लवकरच निधी जमा होईल. पात्र महिलांचे संयुक्त खाते असल्यासही निधी जमा होईल. ज्या महिलांचे खाते आधार लिंक नाही, त्यांनी तात्काळ आधार लिंक करून घ्यावे. जेणेकरून त्यांचा निधी लवकरात लवकर खात्यावर जमा होईल. ज्या पात्र महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरायला विलंब झाला त्यांनाही ही योजना लागू झाली तेव्हापासून या योजनेचा लाभ मिळेल.
खासदार डॉ. बोंडे पुढे म्हणाले की, मुलींच्या शिक्षणावर विशेष भर द्या. राज्य शासन ‘मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना’ या वर्षीपासून राबवित आहे. या योजनेंतर्गत मेडीकल, इंजिनिअरींगसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रक्कमेच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के शुल्क माफीचा लाभ मंजूर करण्यात येत आहे. यासाठी मुलींच्या शिक्षणावर विशेष भर द्या. तसेच मुलींसाठी अग्निवीर योजना सुरू असून याचा लाभ मुलींनी घ्यावा. याचप्रमाणे जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये जेष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ घेण्याच्या आवाहन त्यांनी यावेळी केले .
आमदार श्री.अडसड यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असल्याचे सांगून पुढे म्हणाले की, या योजनेत सहभागी होण्यासाठी अमरावती जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी २४/ ७ तास मदतकक्ष स्थापन करण्यात आला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स या क्षेत्रीय स्तरावर उत्तमरित्या जबाबदारी सांभाळीत असल्याचे ते यावेळी म्हणाले .
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या समन्वय व एकत्रितपणे काम केल्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यात अल्पावधीत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. पात्र लाभार्थी महिलांची नोंदणी केल्यापासून ते त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईपर्यंत या सर्व कार्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांची खूप मोलाची मदत होत आहे. योजनेचे नोडल अधिकारी डॉ . कैलास घोडके या योजनेची अंमलबजावणी उत्तमरित्या करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
खासदार डॉ. बोंडे ,श्री. राणा, आमदार श्री .अडसड, जिल्हाधिकारी श्री. कटियार यांना रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर भगिनींनी राख्या बांधल्या. यामुळे या शासकीय कार्यक्रमाला एक कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले होते.
पुणे येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास घोडके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पर्यवेक्षिका कीर्ती खन्ना यांनी तर आभार मनपाचे नरेंद्र वानखडे यांनी मानले.