आता अंगणवाडीतही जॉनी जॉनी येस पप्पा…..  जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते शुभारंभ !

0
22
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंगणवाडी केंद्रातून इंग्रजी विषयाचे धडे, हा उपक्रम राबविणारा अमरावती हा महाराष्ट्रातील प्रथम जिल्हा

 अमरावती, दि. 15 अंगणवाडीतील बालकांना आनंददायी शिक्षण मिळावं, बालकांच्या मनातील इंग्रजी विषयांची भीती कमी व्हावी तसेच इंग्रजी विषयात त्यांना बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता त्यांच्या अपेक्षाही पूर्ण व्हाव्यात यासाठी आता अंगणवाडी केंद्रातून इंग्रजी शिक्षणाचे धडे बालकांना देण्यात येणार आहेत. याचा शुभारंभ शिराळा येथील अंगणवाडी केंद्रात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केला.

       इंग्रजी शिक्षण हे आता काळाची गरज बनली आहे. इंग्रजी ही रोजच्या बोलण्यातील भाषा होत आहे. विविध विषयांवरील सखोल माहिती आजही बहुतांशी इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी ही संवादाची, व्यापाराची आणि आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे या पिढीतील बालके इंग्रजी विषयात कुठेही कमी पडू नये किंवा इंग्रजी विषयाबद्दल त्यांच्या मनात भीती असू नये हा उद्देश समोर ठेवून महिला व बालविकास विभाग अमरावती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने यावर्षीपासून अंगणवाडीमध्ये इंग्रजी शिकविण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

             एका महिन्यात दोन कविता, काही परिचित शब्द, काही क्रियात्मक शब्द, तीन अल्फाबेट आणि दोन अंक असा सुटसुटीत अभ्यासक्रम अंगणवाडी सेविकांसाठी तयार करण्यात आला आहे. यासाठी सर्व पर्यवेक्षिकांना आणि अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावरून प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रातून हा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावरून सनियंत्रण करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटी पर्यवेक्षकेमार्फत दुसऱ्या अंगणवाडी केंद्रांचे मूल्यांकन करण्यात येणार असून हा अभ्यासक्रम किती उपयुक्त आहे याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.

              या उपक्रमाचा शुभारंभ करतेवेळी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके, तहसीलदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी विलास दुर्गे, पर्यवेक्षिका आरती चिकटे तसेच शिराळा येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस बालकांसह उपस्थित होत्या.

“सहा वर्षापर्यंत बालकांचा 90 टक्के विकास होतो. त्यामुळे बालक कोणतीही भाषा सहज अवगत करू शकतो. इंग्रजी भाषाही अंगणवाडी केंद्रातील बालके सहज अवगत करतील आणि नवनवीन शब्द त्यांना ज्ञात होतील. याचे निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील असा विश्वास श्री. कटियार यांनी यावेळी व्यक्त केला.

veer nayak

Google Ad