बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राणी क्लेष समितीचा आढावा; जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी ‘इअर टॅगिंग’ बंधनकारक- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

0
70
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 11 बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची अवैध वाहतूकीवर कारवाई करुन गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी इअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व गोवंश जनावरांच्या सुरक्षितेसाठी इयर टॅगिंग करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना आज दिल्या.

जिल्हास्तरीय प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुल भवनात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. शिवेंद्र महल्ले, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक मेहेरकर, जिल्हा परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम सोळंके तसेच अशासकीय सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, येत्या सोमवारी बकरी ईद साजरी होणार असून जिल्हा पशु संवर्धन विभागाने मनुष्यबळाचे नियोजन करुन जिल्ह्यातील अधिकृत पशुवधगृहामध्ये जनावरांची तपासणी करावी. जनावरे अवैध विक्रीबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. प्राणीक्लेष प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात याव्यात. तसेच सर्व लहान-मोठ्या पशुधनाला 1 जून पासून ईअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कानातील बिल्याशिवाय पशुधनाची खरेदी-विक्री व वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पशुधनाची इअर टॅगिंग करण्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करावी.

महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारचा गोवंश जसे गाय, वळू, बैल या प्राण्यांची कत्तल करण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. या कायद्याचे पालन करण्यासाठी सदर समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा करण्यात आली. सभेमध्ये अशासकीय सदस्यांनी जनावरांना शासन निर्णयानुसार टॅगिंग करण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर उपायुक्त पशु संवर्धन डॉ. संजय कावरे यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय येथे पशुंना टॅगिंग करण्यात येत असल्याचे सांगितले. बकरी ईदच्या अनुषंगाने शहरात जनावरांच्या तपासणीसाठी बॉर्डर सिलींग ठिकाणी व कत्तलखान्यावर तपासणीकरिता पोलीस व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

जनावरांच्या अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सिमावर्ती भागात जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यांनी योग्य समन्वय ठेवून अवैध वाहतूकीवर कडक कारवाई करावी. यासाठी शहरी व ग्रामीण भागातील पोलीस चौकीवर कडेकोट बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे प्राणी संरक्षण कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिल्या.

प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे शासकीय व अशासकीय सदस्यांची बैठक पोलीस आयुक्त कार्यालय येथे आज सकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. शिवेंद्र महल्ले, सर्व पोलीस अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

veer nayak

Google Ad