अमरावती, दि. 17 प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2023-24 अंतर्गत रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनीने खरीप -2023 अंतर्गत नाकारण्यात आलेल्या पूर्व सूचनांची टक्केवारी जास्त असल्याने या सूचना पुन्हा तपासून शेतकऱ्यांची यादी कृषी विभागास सादर करावी. तसेच तालुका धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पूर्व सूचनांची पुन्हा तपासणी करून 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात यावी. अन्यथा पीक विमा कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभाग येथे आज पीक विमा योजना तसेच कृषी विभागाच्या संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपूते, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, कृषी विकास अधिकारी, व्यवस्थापक, अग्रणी बॅक अमरावती, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, संबंधित अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2023-24 बाबत जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी आढावा घेतला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा कालावधी 30 जून 2024 ला पूर्ण होत असल्याने ग्रामस्तरीय समितीचे खाते बंद करून दस्तावेज व जड संग्रह ग्रामपंचायत कार्यालयास हस्तांतरित करण्याबाबत यावेळी त्यांनी निर्देश दिले. यासाठी अमरावती अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी बॅकांचे खाते बंद करावे. तसेच प्रकल्पांतर्गत अनुदान वाटप केलेल्या शेडनेट व अवजारे बँक आढळून न आलेल्या शेतकऱ्यांना वसूलीबाबत नोटीस देण्याच्या सूचना दिल्या.
खरीप हंगामातील खते व बियाणे नियोजनाच्या अनुषंगाने बडनेरा रेल्वे रेक पॉईंटमध्ये खताची रेक लागल्यावर त्याला प्राधान्य देण्याविषयी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी रेल्वे प्रशासनास निर्देश दिले. प्राप्त होणाऱ्या खताच्या किमान 30 टक्के युरिया व डिएपी बफर स्टॉकसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना खत कंपनीला दिल्या. तसेच खरीप हंगामात कापूस बियाणे पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने बियाणे योग्य पध्दतीने वितरण करण्याच्या सूचनाही यावेळी बियाणे कंपनीला दिल्या.