मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक; आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

0
126
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 13 मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय व संपर्क आवश्यक आहे. वेळेवर संपर्क स्थापित करुन आपण प्रतिसाद देऊ शकतो, त्यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष व सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक महसूल भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, धारणी उपविभागीय अधिकारी रिचर्ड यान्थन, भातकूली उपविभागीय अधिकारी मीनू पी.एम., निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय कावरे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व तहसीलदार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. पाऊस वादळ प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली विज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. आपात परिस्थितीसाठी सर्व विभागाने समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश दिले.

धरणातील जलसाठ्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत. आवश्यक तिथे निवारा कक्ष उभारावेत. धरणातील पाणी सोडताना तहसीलदार, पोलीस व कंट्रोलरूमला 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी. हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील 1 हजार 985 गावांपैकी संभाव्य पूरबाधित गावे 482 आहेत. जिल्ह्यात 2019 ते 2024 या काळात वीज पडून 47 व पुरामुळे 66 मनुष्यहानी झाली. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक 24 तर तालुकास्तरावर 168 तसेच 126 अशासकीय संस्था व 300 आपदा मित्र व आपदा सखींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यंत्रणेकडे 6 मोटर बोट, 226 लाईफ जॅकेट, 216 लाईफ रिंग्ज, 109 रोप बंडल, 85 सर्च लाईट, 22 मेगा फोन, ग्लोव्हज्, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पथकाकडून मॉक ड्रिलचे नियोजन करण्यात आले आहे. तालुका स्तरावरही मॉक ड्रिल घेण्यात यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यन्वित

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपातकालीत स्थितीत संपर्कासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन निवासी उपजिल्हाधिकारी यांची जिल्हा नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे दिवसा तसेच रात्रपाळीत कर्मचारी कार्यरत असतात. जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती घडल्यास तात्काळ या घटनेची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयास कळविण्यात येते. तेथून इतर संबंधित यंत्रणेला याबाबत त्वरित अवगत करण्यात येते. जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती घडल्यास आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणेसोबत तात्काळ समन्वय साधला जातो. नैसर्गिक आपत्ती आल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0721-2662025 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्ती काळातील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक

* राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक(NDRF), पुणे – 02114-231509
* आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुंबई – 22-22025274/022-22837259
* नियंत्रण कक्ष, मंत्रालय, मुंबई – 022-22027990/022-22026712
* राज्य राखीव पोलीस दल, नागपूर – 0712-2564973-2560543
* नियंत्रण कक्ष पोलीस विभाग – 100
* जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती – 0721-2662025
* आपत्कालीन टोल फ्री क्रमांक – 1077
* अग्निशामक विभाग (मनपा) – 101, 0721-2576423

veer nayak

Google Ad