अमरावती, दि. 09 बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 आणि महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंध अधिनियम संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. दि. 10 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात बालविवाह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह करणाऱ्यावर अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई केल्या जाईल, असे सूचना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार अक्षय तृतीया या दिवशी होणारे बालविवाह लावण्यास प्रोत्साहन देणाऱ्या व बालविवाह लावण्याऱ्यावर बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार कारवाई केल्या जाते. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. तसे नसल्यास विवाह लावून देणाऱ्या व्यक्ती, विवाहात उपस्थित सर्व नागरिक, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, फोटोग्राफर, लग्नविधी करणारे व आदींवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी संबंधिताना दिले. अधिनियमानुसार 2 वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा केल्या जाईल.
गत सहा वर्षात तब्बल 3 हजार 954 बालविवाह प्रशासकीय यंत्रणेमार्फत रोखण्यात आले. तर मागील वर्षभरात 24 बालविवाह महिला व बालविकास विभागामार्फत जिल्हा बाल संरक्षण कक्षाव्दारे थांबवण्यात आले आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16(1) नुसार नियुक्त बालविवाह प्रतिबंध अधिकारी(ग्रामीण क्षेत्रासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी) यांना बालविवाह घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोग यांच्या निर्देशाप्रमाणे दक्ष राहून बालविवाह रोखण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृती कार्यक्रम, रॅली, माहितीपत्रके अशा विविध माध्यमातून बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथेविरूध्द जनजागृती करावी. आपापल्या परिसरात बालविवाह होत असल्यास, त्याची माहिती आश्रमशाळेतील अधिक्षक, शिक्षक, पोलिस स्टेशन, पोलिस पाटील, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, शहरी व ग्रामीण अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, माध्यमिक व प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात यावी. तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 व 112 किंवा मो. क्रमांक 9021358816 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.