अमरावती, दि.23 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. 07 – अमरावती लोकसभा मतदार संघासाठी माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ कटियार हे आहेत. निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे तसेच मुद्रीत माध्यमाव्दारे मतदान आणि मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणिकरण करणे आवश्यक असल्याचे श्री. कटियार यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार दि. 25 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणीकरणासाठी समितीकडे तीन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.