धामणगाव रेल्वे,
बहुप्रतीक्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिराचे स्वप्न साकार झाले आणि श्री प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना अयोध्येत करण्यात आली त्यामुळे करोडो हिंदू आणि श्री रामभक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यात. या अनुषंगाने दरवर्षीपेक्षाही यंदा श्रीरामनवमी जयंती निमित्य धामणगावात ऐतिहासिक भव्य शोभायात्रा( मिरवणूक) काढून साजरी करण्यात येणार आहे. आज बुधवार, दि.१७ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता श्री रामजन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभा यात्रेची सुरुवात दत्तापूर येथून निघून कॉटन मार्केट चौक, शहीद भगतसिंग चौक, रेल्वे गेट ते गांधी चौक, मेन रोड, नूतन चौक, सिनेमा चौक मार्गे टिळक चौकातील श्री हनुमान मंदिरात महाआरतीने सांगता होईल. दरवर्षीप्रमाणे श्रीराम शोभा यात्रेचे शहरात ठीक ठिकाणी भव्य स्वागत व थंड पेय आईस्क्रीम ची व्यवस्था नगरवासीयांतर्फे करण्यात येणार आहे मिरवणुकीतील विशेष आकर्षणे म्हणजे २१ फुटी हनुमानजींची सजीव झाकी आणि ११ फुटी प्रभू श्रीरामाची मूर्ती सोबत रौनक बॅन्जो, डीजे, अयोध्येत स्थापित केलेली श्री रामललाची भव्य हुबे हूब मूर्ती, इस्कॉन मंदिराची भजन मंडळी, महाकाल पथक उज्जैनचे झांज पथक, महिला भजन गट, श्रीराम रामायण भजन मंडळ, केवट झांकी, राधाकृष्ण झांकी, शिवलिंग झांकी, भारतमाता झांकी, राम दरबार झांकी, गोमाता झांकी आदींचा समावेश असेल.
शोभायात्रेत जास्तीत जास्त श्रीराम भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.