अमरावती जिल्ह्यातील मतदानांची टक्केवारी वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मतदानावर बोलू काही.. …” या फेसबुक लाईव्ह शोचे आयोजन सोमवारला सकाळी १०:०० वाजता करण्यात आले आहे. यामध्ये सौरभ कटियार जिल्हाधिकारी अमरावती, नवीन चंद्र रेड्डी पोलिस आयुक्त अमरावती, संतोष जोशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, देविदास पवार आयुक्त महानगरपालिका अमरावती हे सहभागी होणार असून जिल्ह्यातील सर्व मतदारांना फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी अमरावती हे स्वीप टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या युक्त्याची अंमलबजावणी करीत आहेत.याचाच एक भाग म्हणून डॉ.कैलास घोडके, जिल्हा नोडल अधिकारी स्वीप यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मतदानावर बोलू काही या या फेसबुक लाईव्ह शोला मिळत असलेला उदंड प्रतिसाद बघून स्वतः जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभाग घेऊन मत जिल्ह्यातील मतदारांसोबत संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रत्येक गावातील नागरिक सहभागी होणार असून प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील एका गावातील काही ज्येष्ठ नागरिक, महिला, नवीन मतदार, शेतकरी हे जिल्हाधिकारी यांच्या सोबत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे अमरावती जिल्ह्यातील गावागावात प्रेक्षपण होणार असून सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमरावती यांनी केले आहे.