अमरावती, दि. 20 महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचेमार्फत कामगार नोंदणी करणे, नुतनीकरण करणे, लाभ वाटप, सुरक्षा संच, अत्यावश्यक संच, गृहपयोगी संचाचे वाटप सुरु होते. परंतु लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता दि. 16 मार्च 2024 पासून लागू झाल्यामुळे कामगार नोंदणी व साहित्य वाटप पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सहायक कामगार आयुक्त यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभ दिल्या जाते. संगणकीकृत प्रणालीव्दारे ऑनलाईन अर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांच्या छाननी, तपासणी अंती सदरचे लाभ हे थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा केले जातात. तथापि सदरची कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्याने लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केलेला आहे. सर्व बांधकाम कामगारांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही आमिष अथवा दबावास बळी पडू नये व अशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये रितसर तक्रार दाखल करावी. तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा