धामणगाव रेल्वे
जन्म आणि मृत्यू या कालावधीत असणारा काळ म्हणजे आयुष्य आपण आयुष्यात अनेक चुका करतो या चुका भरून काढण्यासाठी नामस्मरणाची महिमा अपरंपरा असल्याने प्रत्येक माणसाने किमान दररोज एक तास तरी भगवंताचे नामस्मरण करावे असा अमृतबोध आकोट येथील ह भ प प्रवीण महाराज कुलट यांनी दिला
जळगाव आर्वी येथील संत लहरी बाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आकोट येथील कुलट महाराज यांनी देवाच्या नामाचा महात्म्य सांगितले नामस्मरण ही नवविधाभक्तीतील तिसरी भक्ती. नाम अखंड जपत जावे. वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करावे. प्रातःकाळी, दुपारी, सायंकाळी नामस्मरणाचा सराव करावा, सवय करावी. सुखदुःख, आनंद, स्वस्थता, अस्वस्थता,चिंता अशा मनाच्या कोणत्याही अवस्थेत नामस्मरणा वाचून राहू नये. जीवनात स्थित्यंतरे येतच राहणार. सर्व दिवस सारखे राहत नाहीत. कधी यश तर कधी अपयश. सुस्थिती, दु:स्थिती अशा प्रतिकूल- अनुकूल परिस्थिती येतच राहणार, पण नामस्मरण स्थिर ठेवावे. मोठे वैभव प्राप्त झाले, सामर्थ्य वाट्यास आले, सत्ता मिळाली, फार मोठे ऐश्वर्य भोगण्याची संधी मिळाली, तरी नामस्मरण सोडू नये. नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात, विघ्ने निवारण होतात. श्रद्धा ठेवून नामस्मरण केले, तर अनेक दुःखे दूर होतात असेही कुलट महाराज म्हणाले
नामस्मरण करण्यासाठी वयाचे बंधन नाही. तरुणपणी, म्हातारपणी, संकटाचे प्रसंगी सदासर्वकाळ व अंतकाळी सुद्धा नामस्मरण करीत असावे. नामस्मरण केल्याने अनेक जण श्रेष्ठत्वाला जाऊन पोहोचले असल्याचे ते म्हणाले सात दिवस चालणाऱ्या या संत लहरी बाबा पुण्यतिथी महोत्सवाला दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे