दर्यापुर : घरातील अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाच्या मुलाची वन विभागात तर मजुराच्या मुलाची भारतीय नौदलात निवड झाल्याची भूषवाह बाब तालुक्यातील येवदा येथे पुढे आली. या दोघांच्याही कार्याची, जिद्द, मेहनत व चिकाटीची दखल भाजप तर्फे घेत सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी दोघांसह त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान केला. तालुक्यातील येवदा येथील करण गजानन आठवले याची वन विभागात निवड झाली आहे. करणचे वडील रिक्षा चालक आहेत. प्रसंगी वडिलांना हातभार लावण्यासाठी करण देखील त्यांच्यासोबत रिक्षा चालवायचा. अशा कठीण परिस्थितीत त्याने यश गाठत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्या माध्यमातून त्याची वनविभागात निवड झाली आहे. तर दुसरीकडे राहुल प्रमोद शेळके याची भारतीय नौदलात निवड झाली आहे. राहुलचे वडील मोलमजुरी करतात. वडिलांना मदत म्हणून राहुल देखील मिळेल ते काम करायचा. येवदा परिसरात स्वतः गाडी भाड्याने घेऊन तो चालकाचे काम करायचा. अशा परिस्थितीत दोघांनीही अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनत कायम ठेवली. यातूनच करणची वनविभागात. तर राहुलची भारतीय नौदलात निवड झाली आहे. दोघांच्याही कार्याची दखल घेत भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी त्यांच्या घरी जाऊन आई-वडिलांसह सन्मान केला. परिस्थितीशी दोन हात करून यश मिळवणारे तरुण हे गावाचे भूषण आहेत. त्यांच्यामुळेच गावाची ओळख ही वाढत असते. अशा युवकांना बळ देण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करते. असा आशावाद सोनटक्के यांनी व्यक्त करत पुढील प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपच्या किसान मोर्चाचे उपाध्यक्ष संजय वाघमारे, युवा मोर्चाचे पंकज कान्हेरकर, शाखाप्रमुख मयूर वांदे, अक्षय तिडके, ज्ञानपाल राऊत, विकी गुप्ता, आयुष मोहोळ यांच्यासह विविध मान्यवर या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित असल्याची माहिती भाजपचे प्रसिद्धी प्रमुख ऋषिकेश इंगळे यांनी दिली
—- डॉ. अनिल बोंडेतर्फे शुभेच्छा
दोघांच्याही निवडी संदर्भातील माहिती प्राप्त होताच वडनेर गंगाई येथील शुभम बायस्कार यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या निर्देशाप्रमाणे करण व राहुल यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. देशसेवा राष्ट्रसेवा करणाऱ्या तरुणाईला मदत करण्यासाठी खासदार डॉ.अनिल बोंडे हे सदैव तत्पर असतात असेही त्यांनी दोघांशी संवाद साधताना सांगितले.