संघ संपूर्ण समाजाचे संघटन आहे.सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन जी वैद्य यांचे प्रतिपादन.संघ शिक्षा वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये बदल.

0
13
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नागपूर, 15 मार्च 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघ संपूर्ण समाजाचे संघटन आहे, असे म्हंटले होते, याचा अनुभव गेल्या 99 वर्षांपासून आपण घेत आहोत. वर्ष 2017 ते 2024 या काळात संघाच्या कार्याचा जो विस्तार झाला, त्यावरून त्याची व्यापकता आपल्या लक्षात येते. देशाच्या 99 टक्के जिल्ह्यांमध्ये संघाचे कार्य सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन जी वैद्य यांनी आज अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या स्वामी दयानंद सरस्वती परिसरामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी मंचावर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील जी आंबेकर उपस्थित होते. 

अखिल भारतीय सह प्रचार प्रमुखद्वय नरेंद्र कुमार जी आणि आलोक कुमार जी सुद्धा यावेळी उपस्थित होते.

डॉ. मनमोहन जी वैद्य संघ कार्याच्या विस्ताराविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले की, कार्याच्या दृष्टीने संघाचे 45 प्रांत आहेत. यानंतर विभाग, जिल्हा आणि त्यानंतर सगळ्यात खाली खंड (तालुका) अशी रचना आहे. अशा एकूण 922 जिल्ह्यांमधील 6,597 खंडांमध्ये शाखा अस्तित्वात आहेत. बारा-पंधरा गावांचे एक मंडल असते. अशा 27,720 मंडलांमध्ये संघाच्या एकूण 73,117 दैनिक शाखा सुरू आहेत. मागील वर्षी 4,466 शाखा वाढल्या आहेत. या शाखांमध्ये 60 टक्के विद्यार्थी व 40 टक्के नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यामध्ये 40 वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रौढ स्वयंसेवकांची संख्या 11 टक्के आहे. साप्ताहिक मिलनांची संख्या 27 हजार 717 असून, गतवर्षी यात 840 शाखांची वाढ झाली आहे. संघ मंडळींची संख्या 10 हजार 567 आहे. नगर आणि महानगरांमध्ये दहा हजार वस्त्यांमध्ये 43 हजार दैनिक शाखा लागतात.

महिला समन्वय

महिला समन्वयाच्या कार्यामध्ये राष्ट्रसेविका समिती आणि अन्य काही प्रमुख महिला संघटनांच्या माध्यमातून 44 प्रांतांमध्ये 460 संमेलने घेण्यात आली. ज्यात 5 लाख 61 हजार महिला सहभागी झाल्या. संघाच्या शताब्दी वर्षाच्या दृष्टिकोनातून ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. भारतीय चिंतन, समाज परिवर्तनामध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा हाच यामागचा हेतू आहे.

देवी अहल्याबाई होळकर यांची जन्म त्रिशताब्दी मे 2024 ते एप्रिल 2025 या काळात देशभरामध्ये साजरी केली जाणार आहे. त्यांनी संपूर्ण देशात धार्मिक स्थळांचे पुनर्निर्माण आणि जे अभावग्रस्त लोकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी खूप मोठे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल समाजाला फारशी माहिती नाही. यावर्षी अहल्याबाईंचे योगदान संपूर्ण भारतामध्ये प्रसारित करण्याच्या दृष्टिकोनातून आखलेल्या योजनेवर कार्य सुरू आहे. शतप्रतिशत मतदान आणि सर्वाधिक मतदान हे तर आमचे नागरीक कर्तव्य असल्याचेही डॉ. मनमोहन जी वैद्य म्हणाले.

अयोध्येमध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्याच्या निमित्ताने देशभरात व्यापक जनसंपर्क करण्यात आला. पूजीत अक्षता वितरण अभियानाद्वारे 5,78,778 गावांमध्ये आणि 4,727 नगरांमध्ये एकूण सुमारे 19 कोटी 38 लाख, 49 हजार 71 परिवारांमध्ये स्वयंसेवकांसह 44 लाख 98 हजार 334 लोकांनी संपर्क केला. या अभियानाला मिळालेल्या उत्साही प्रतिक्रिया आणि स्वागतामुळे आमच्या विश्वासाला लोकांनी पुन्हा एकदा बळ प्रदान केले, असेही डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.

संघ शिक्षा वर्गाचा नवा पाठ्यक्रम

संघ शिक्षा वर्गाच्या रचनेमध्ये नवीन पाठ्यक्रम जोडण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. पूर्वी संघ शिक्षा वर्गाच्या रचनेमध्ये 7 दिवसांचा प्राथमिक वर्ग, 20 दिवसांचे प्रथम वर्ष, 20 दिवसांचे द्वितीय वर्ष व 25 दिवसांचा तृतीय वर्षाचा वर्ग होता. नवीन रचनेमध्ये 3 दिवसांचा प्रारंभिक वर्ग, 7 दिवसांचा प्राथमिक शिक्षा वर्ग, 15 दिवसांचा संघ शिक्षा वर्ग, 20 दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग -1 आणि 25 दिवसांचा कार्यकर्ता विकास वर्ग-2 राहील. या वर्गांमध्ये विशेष रूपाने व्यावहारिक प्रशिक्षणाचा समावेश केला जाईल.

संघाच्या rss.org या वेबसाईटवर दरवर्षी जॉईन आरएसएससाठी वर्ष 2017 ते 2023 पर्यंत 1 लाखाहून अधिक विनंती अर्ज सातत्याने येत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 मध्ये रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर यात दुपटीने वाढ झाली आहे.

प्रतिनिधी सभेचे उद्घाटन

तत्पूर्वी आज सकाळी 9 वाजता संघाच्या अखिल भारतीय वार्षिक प्रतिनिधी सभेचे उद्घाटन प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी भारत मातेच्या छायाचित्राच्या पुष्पार्चनाने केले.

veer nayak

Google Ad