अमरावती, दि. 11 (जिमाका) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतून युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे कर्ज मंजूर झालेल्या कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई शाखेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शासनाच्या योजनांतून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांचे स्विकृती पत्र वाटप करण्यात आले. विभागीय बँक व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी शाखेतील कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेची माहिती घेतली. कर्ज मंजुरीची प्रकरणे ऑनलाईन येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बँकेच्या शाखेकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. केंद्र आणि राज्य शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी कर्ज योजना राबवून सबसिडी देत आहे. त्यामुळे युवकांनी यासाठी पुढे येऊन रोजगार देणारे व्हावे, असे आवाहन केले.
पर्यटन विभागातर्फे आई योजना राबविण्यात येत आहे. यात कर्जावरील व्याज माफीची योजना आहे. याचाही कर्जदारांनी लाभ घ्यावा. तसेच चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून कर्जाची जबाबदारीने परतफेड करावी. बँकेने कर्ज दिलेल्या उद्योगांना बँकांच्या अधिकाऱ्यांनी भेट द्यावी. तसेच कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.
बँकेतर्फे शिवणकाम, तेल घाणी, बांधकाम व्यवसाय, बांधकाम साहित्य, शेळी पालन, ब्युटी पार्लर, रेडीमेड गारमेंट, फोटो स्टुडिओ, आटा चक्की, डेअरी, कँटीन आदी योजनांसाठी कर्ज स्विकृतीचे पत्र देण्यात आले.