पत्रकारांचे एसडीओंना निवेदन
पो.स्टे.ची जागा नसतांनाही जागेवर दाखवित आहे हक्क
चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे येथील तात्पुरत्या स्वरूपाचे अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे कार्यालय कायम ठेवा अशी मागणी स्थानिक पत्रकारांनी एसडीओ कार्यालयात शुक्रवारी (ता. 22) दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संपर्क कार्यालय चांदूर रेल्वे शहरातील श्री मन्नालाल गुप्ता विद्यालयाच्या मुख्य प्रवेश व्दार जवळ ४० फुट रूंदीचा रस्ता सोडुन व चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनच्या वाॅल कंपाऊड लगत काही अंतरावर आहे. त्याचा आम रहदारीला कोणताही अडथळा होत नाही. ते तात्पुरत्या स्वरूपाचे टिनपत्र्याचे पत्रकार संपर्क कार्यालय आहे. सदर जागा ही नगर पालीकेची ई क्लास जमीन आहे. मागील दहा वर्षापासून त्या ठिकाणी कार्यालय आहे. ग्रामीण भागातील नागरिक त्यांच्या समस्या या कार्यालयात मांडतात. असे असतांना चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनची जागा नसतांना ते या जागेवर हक्क दाखवित आहे. चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनची चतुःसिमा किती, त्यांची हद किती तसेच त्यांच्या जागेच्या नकाशा नुसार किती जागा आहे ? या संदर्भात पत्रकारमंडळींनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशन व नगर परिषद कार्यालयात भेट घेवून विनंती करून विचारले. परंतु दोन्हीकडे या जागेची हद्द सांगीतलेली नाही. सदर पत्रकार कार्यालय हे नगर पालीकेच्या ई क्लास जागेवर असुन पोलिस स्टेशनच्या हद्दीत व जागेत येत नाही. त्या जागेवर कोणतेही प्रस्तावित विकासात्मक काम नाही. असे असतांना चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन व नगर पालीका दोन्ही विभाग मोघमपणे कार्यवाही करीत आहे. चांदूर रेल्वे पोलिस बळाचा वापर करून वाहतुकीसाठी व अन्य कोणत्यांही प्रकारचा त्रास नसतांना अतिक्रमण असल्याच्या नावाखाली सदर कार्यालय हटविण्याचा प्रयत्न करीत आहे. सदर जागा चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत नसतांनाही पो.स्टे. कडून अतिक्रमण काढण्यासाठीचे पत्र चांदूर रेल्वे नगर पालीकेला दिले आहे. परंतु चांदूर रेल्वे नगर पालीकेने पोलिस स्टेशनची हद्द किती याची कोणतीही शहनिशा न करता सदर कार्यालय सात दिवसाच्या आत काढा अशी नोटीस बजावली आहे.
त्यामुळे सदर प्रकरणात चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनची चतुःसिमा किती,त्यांच्या नकाशानुसार जमीन किती आहे याचे प्रत्यक्ष शहनिशा चांदूर रेल्वे नगर पालीकेेेने करावी आणि चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनच्या हद्दीत न येणारे आणि नगर पालीका ई-क्लास जमीनवरील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ संपर्क कार्यालय कायम ठेवावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी आ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान, प्रा. रवींद्र मेंढे, बाळासाहेब सोरगीवकर, उत्तमराव गावंडे, राजीव शिवणकर, निशीकांत देशमुख, रितेश मुंधडा, शहजाद खान, अमोल गवळी, इरफान पठाण, धीरज नेवारे, प्रकाश रंगारी, अजय गावंडे, संजय डगवार, राहुल देशमुख यांसह इतर पत्रकार मंडळी उपस्थित होती.