आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांची कौशल्य विकास कार्यालयाला भेट
अमरावती, दि. 19 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विभागास्तरावर रोजगार मेळावा आयोजित करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा योजनावर चर्चा झाली. सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये उमेदवारांना रोजगार मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले. तसेच स्किल इंडिया पोर्टलवरील प्रक्रिया सुलभ झाल्यास अधिक प्रशिक्षण देणारे सहभागी होतील आणि उमेदवारांना प्रशिक्षण देणे शक्य होईल असे सांगितले. आमदार संजय खोडके, सुलभा खोडके यांनी प्लेसमेंट ड्राईव्हचे कौतुक केले. उमेदवारांना रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि इंडस्ट्री असोसिएशन यांच्यासोबत बैठक घेऊन मनुष्यबळाची मागणी विचारात घेऊन लवकरच विभागस्तरावर महारोजगार मेळावा आयोजित करण्याचे निर्देश दिले. सुरवातीला श्रीमती बारस्कर यांनी कार्यालयातील आधुनिकीकरण, तसेच परिसराची माहिती दिली. कौशल्य विकास अधिकारी श्रीमती वैशाली पवार यांनी प्रास्ताविक केले. यासाठी अभिषेक ठाकरे आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष यात्रेचे आयोजन
अमरावती, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे ‘भारत गौरव’ पर्यटक ट्रेन सुरू करण्यात येत आहे. या ट्रेनद्वारे ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या पाच दिवसांच्या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही यात्रा 9 जून 2025 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणार आहे. या यात्रेत रायगड किल्ला, पुणे येथील लाल महाल आणि शिवनेरी किल्ला, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला आणि कोल्हापूर येथील पन्हाळा किल्ला आणि महालक्ष्मी मंदिर यांसारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. यात्रेकरूंना नाश्ता, जेवण, निवास, रेल्वे प्रवास आणि स्थळभेट दरम्यानचा प्रवास खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट असेल. ही पाच दिवसांची यात्रा 9 जून ते 13 जून 2025 दरम्यान असून, 14 जून 2025 रोजी ट्रेन मुंबईला परत येईल. यात्रेसाठी इच्छुक असलेले प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे या स्थानकांवरून ट्रेनमध्ये चढू शकतील. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले आहे.
‘मधाचे गाव’ आमझरी येथे आज जागतिक मधमाशा दिन
अमरावती, दि. 19 : जिल्ह्यातील मधाचे गाव असलेल्या आमझरी येथील निसर्ग पर्यटन संकुलात मंगळवार, दि. 20 मे रोजी सकाळी 11 वाजता जागतिक मधमाशा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधपाळाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नैसगिक संसाधनांचे संवर्धन व ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधाचे गाव संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार चिखलदरा तालुक्यातील आमझरी या गावाची ‘मधाचे गांव’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
आमझरी गाव चिखलदरा पर्यटनस्थळाच्या नजिक आहे. आमझरी वन नर्सरी पर्यटनस्थळ आहे. या गावामधे स्थानिक आदिवासी आग्या मधमाशाचे मध काढण्याचा व्यवसाय पारंपारीक पद्धतीने करतात. त्यामुळे या गावात खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने स्थानिक लाभार्थींना आग्या मधमाशाचे शास्त्रीय पद्धतीने मध काढण्याचे प्रशिक्षण देऊन मध काढण्यासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले आहे. आमझरी येथे मधाचे गाव संकल्पनेनुसार निसर्गातील मधमाशाचे संरक्षण व संवर्धनासोबतच मध व इतर उत्पादनापासून स्थानिक आदिवासीना रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच चिखलदरा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मधमाशाचे निसर्गतील व मानवी जीवनातील महत्व याबाबत माहिती होण्यासाठी विविध उपक्रम प्रस्तावित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात मधमाशी पालन तज्ज्ञाचे मार्गदर्शन मधपाळाना लाभणार आहे. जिल्ह्यातील मधपाळ आणि शेतकऱ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.