नैसर्गिक असलेला शाश्वत किंवा सनातन धर्म श्रेष्ठ की मानव निर्मित उपासना धर्म श्रेष्ठ?
आम्ही आज धर्म धर्म म्हणून ज्यांचा उल्लेख करतो ते धर्म नसून उपासना धर्म आहेत.धर्माचा अर्थ होतो धारण करणे.मानवात प्राकृतिक स्वरुपात असलेले नैतिक कर्तव्य, सदाचार, निती मुल्य,दया,क्षमा, शांती हे मानवीय गुण धारण करणे म्हणजे धर्म होय. अशा धर्माच्या व्याख्येत व्यक्ती धर्म, परिवार धर्म, शेजार धर्म, पुत्र धर्म, पती धर्म, समाज धर्म, राष्ट्रधर्म, विश्वधर्म, व मानव धर्म या संकल्पनेचा समावेश होतो.खरेतर धर्म हा मानवाचा नैसर्गिक गुणधर्म होय. परंतु आज आम्ही ज्यांना धर्म म्हणतो ते धर्म नसून मानवनिर्मित उपासना धर्म होय. वेगवेगळ्या उपासना धर्माची आराधना व प्रार्थना पद्धती वेगवेगळी असल्याने त्यांना उपासना धर्म असे आपण म्हणतो. जसे हिंदू उपासना धर्म, मुस्लिम उपासना धर्म, ख्रिश्चन, बौद्ध, जैन हे सर्व मानवनिर्मित उपासना धर्म होय.
खरे तर धर्म ही सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाचा विचार करणारी संकल्पना होय तर उपासना धर्म मात्र एका समुदायाच्या कल्याणाचा विचार करणारी एक मनुष्य निर्मित संस्था होय. धर्म हा एका कडून दुसऱ्याचे कल्याण साधणारा नैसर्गिक मार्ग होय तर उपासना धर्म हा उपासना मार्गाने स्वकल्याण साधनारा कृत्रिम मार्ग होय. धर्म इतरांच्या कल्याणाचे सोबत आपल्या कल्याणाचा विचार करतो तर उपासना धर्म हे आपले कल्याण साधल्या नंतर इतरांच्या कल्याणाचा विचार करतात. धर्म हा मानवतेला सर्वोच्च स्थान देतो तर उपासना धर्म कर्मकांड व पुजा अर्चा द्वारे भौतिक कामना पुरती करिता एका समुदायाच्या कल्याणाचे नियोजन करतो. दुसरीकडे हाच उपासना धर्म वैराग्याचा मार्ग दाखवुन आध्यात्मिक साधने द्वार मोक्ष रुपी परमार्थ साधण्यास मदत करतो.
आध्यात्मिक उपासनेत काम, क्रोध,लोभ या विकारावर विजय प्राप्त करून परमार्थ साधला जातो.परंतु धर्म मात्र या विकारांवर नियंत्रण स्थापित करुन सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण करणारा नैतिक मार्ग सांगतो.वर्तमानकालीन व्यावहारिक भाषेत सांगायचे झाल्यास जगातील जितके लोकतान्त्रिक राष्ट्र आहेत ते त्यांनी निर्माण केलेल्या लोककल्याणकारी संविधानाच्या मार्गाने शाश्वत किंवा प्राकृतिक सनातन धर्माचे पालन करतात.तर दुसरीकडे काही राष्ट्र मात्र विशिष्ट उपासना धर्माच्या विचारांवर आधारित संविधानाच्या द्वारे बहुसंख्य असणाऱ्या समुदायाच्या कल्याणाचाच विचार करतात व नश्वर असलेल्या उपासना धर्माचे पालन करुन मानवतेला काळीमा फासण्याचे कार्य करतात.
श्रीराम पत्रे