मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा
अमरावती, दि. 14 : यावर्षी मान्सून 7 जून रोजी दाखल होणार आहे. त्यामुळे मान्सून कालावधीतील उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. येत्या मान्सूनमध्ये आपत्तीत एकही मृत्यू होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, मान्सूनपूर्वी करावयाच्या उपाययोजनांसाठी तीन आठवड्यांचा कालावधी आहे. या काळात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून घेण्यावर भर देण्यात यावा. पूर आल्यास नागरिकांना स्थानांतरीत करावे लागते. यासाठी तात्पुरते निवारे बांधण्यात यावेत.
आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव देऊन आवश्यक ती सामुग्री तयार ठेवावी. प्रामुख्याने पूर परिस्थितीत बचाव पथकांचे कार्य महत्वाचे असते. त्यांनी तातडीने प्रतिसाद देऊन कार्यवाही करावी. बचाव कार्यासाठी आवश्यक असलेले बोटी, लाईफ जॅकेट यांची देखभाल दुरूस्ती करावी. तसेच सराव करण्यात यावा. आपत्तीचे नियोजन करताना त्या परिसरातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी.
मान्सून कालावधीत साथीचे आजार पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे औषधसाठा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुस्थितीत ठेवण्यात यावेत. जनावरांनाही जलजन्य आजार होत असल्याने औषधे, लसींचा साठा तयार ठेवण्यात यावा. प्रामुख्याने मेळघाटात संपर्क तुटण्याची समस्या जाणवते. त्यामुळे झाडे पडणे, वीज तारा तुटणे, पुलावरून पाणी वाहण्याच्या काळात तातडीने प्रतिसाद देण्यात यावा.
आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. सतर्क राहून कार्य केल्यास आपत्तीमध्ये होणारी हाणी कमी होण्यास मदत मिळेल. मागील मान्सूनच्या कालावधीत आलेल्या अडचणीच्या परिस्थितीची माहिती घेऊन यावेळी त्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. शिकस्त इमारती कोसळल्यास अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी. नुकसान झालेल्याचा पंचनामा तातडीने करण्यात यावा. याबाबतची माहिती तातडीने देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.