पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्काराचे वितरण
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वेचा विद्यार्थी ठरला गौरवाचा मानकरी
धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी) दि. २२ :
डॉ. होमी भाभा फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा ‘अल्फा एस्पायरिंग यंग सायंटिस्ट अवॉर्ड २०२५’ स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथील कुशाग्र विद्यार्थी पार्थ पानपालिया याला प्रदान करण्यात आला आहे. विज्ञान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी पार्थने हा बहुमान पटकावला.
राज्यभर आयोजित विज्ञान परीक्षा व विविध उपक्रमांमधील उल्लेखनीय यशामुळे पार्थची निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या भव्य पुरस्कार सोहळ्यात पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते त्याला हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी देशभरातील विविध विज्ञान केंद्रांतील विद्यार्थी व मान्यवर शास्त्रज्ञ उपस्थित होते.
या गौरवामुळे स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे विद्यालयात आनंदाचे वातावरण आहे. विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी पार्थचे अभिनंदन करताना सांगितले की, “पार्थ पानपालिया याने आपल्या अथक प्रयत्नातून शाळेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याचे यश अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.” तसेच, शाळेच्या वतीने त्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पार्थ पानपालिया याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान माझ्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित आहे. भविष्यात यशस्वी शास्त्रज्ञ बनण्याचे माझे स्वप्न आहे आणि विज्ञान क्षेत्रात मोठे योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या यशाबद्दल शाळेतील शिक्षकवृंद तसेच पालकांनी पार्थचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्याच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात कौतुकाची लाट पसरली आहे.