धामणगाव रेल्वे – स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे रामनवमीचा पावन उत्सव अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेच्या आदरणीय प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी, सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीरामांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि रामरक्षेच्या सामूहिक पठणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रामनवमीचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रभावी भाषणांद्वारे मांडले. विविध भक्तिगीतांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
इयत्ता सहावीच्या भुवी बमनोटे हिने श्रीरामाच्या चरित्रावर प्रभावी भाषण सादर केले, तर आराध्या करनाके हिने रामचरित्रावर आधारित सुंदर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच, शिक्षकांनी एकत्रितपणे रामगीत सादर केले, ज्यामुळे वातावरण अधिक भावपूर्ण झाले.
कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे रामायणावर आधारित नृत्य त्यात श्रीरामाचा जन्म, वनवास, सीतेचे अपहरण आणि रावणवध या महत्त्वपूर्ण प्रसंगांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनय, नृत्य आणि संगीत सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन येलो हाऊसच्या वतीने करण्यात आले होते. येलो हाऊसच्या प्रभारी स्नेहा काकस आणि सदस्य सचिन देवघरे, स्नेहल राऊत, दीप्ती चौबे, आणि पूजा भैसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. नृत्य सादरीकरणासाठी सचिन उके यांचे मार्गदर्शन लाभले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी शिक्षिका स्नेहा काकस यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
या उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांची आणि प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी पैलूंची ओळख झाली. शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना रामचरित्रावर मार्गदर्शन करून त्यात अंतर्भूत असलेल्या नीतिमूल्यांची जाणीव करून दिली.
रामनवमीसारख्या धार्मिक सणाच्या निमित्ताने शाळेत एकात्मतेचा, संस्कृतीप्रेमाचा आणि भक्तिभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला.