प्रतिनिधी | धामणगाव रेल्वे
धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा वितरण केंद्रात कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. मनोज बबनराव ढोक यांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. ढोक हे नियमित कर्तव्य बजावत असताना ११ केव्ही वीज लाईनवर काम करत होते. त्याचवेळी त्यांना अचानक जोरदार विजेचा शॉक लागला व ते खाली कोसळले. घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना यवतमाळ येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे महावितरण विभागात तसेच धामणगाव रेल्वे परिसरात शोककळा पसरली आहे. कर्तव्यदक्ष व मनमिळावू स्वभावामुळे श्री. ढोक यांची सहकाऱ्यांमध्ये विशेष ओळख होती.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व दुःखित कुटुंबियांना या आघातातून सावरण्याची शक्ती देवो, अशी सर्वत्र प्रार्थना व्यक्त होत आहे.

















